परिस्थितीनुसार निर्णय घेऊ : शिवसेनेसोबत कोणतंही शत्रूत्व नाही– फडणवीसांचं मोठं विधान
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुंबई, वृत्तसंस्था : सद्या राज्यांच्या राजकारणात भेटी गाठीचा सिलसिला पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. संजय राऊत आणि शेलार यांनी ही बैठक झाल्याचे नाकारले असले तरी अंतगर्त काहीतशी शिजत असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या विषयावर भाष्य करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “राजकारणात जर तरला अर्थ नसतो. परिस्थिती जी असते त्यावर निर्णय होत असतो,” असं मोठं विधान केलं आहे. तसेच शिवसेनेशी कोणतंही शत्रुत्व नाही, असेही ते म्हणाले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी वरील भाष्य केले. ते मुंबईत बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी शिवसेना आणि भाजपत निर्माण झालेल्या वैचारिक मतभेदांवर भाष्य केलं. “आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हतं. आमच्या वैचारिक मतभेद निर्माण झाले. कारण आमचा हात सोडून आमचे मित्र ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळे मतभेद उभे झाले. हा धुऱ्याचा वाद नाही. आमच्यात कुठलेही शत्रूत्व नाही,” असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याचा आम्ही प्रयत्न करु असे फडणवीस म्हणाले. तसेच सभागृहात प्रश्न मांडू दिले नाही तर आम्ही रस्त्यावर जनतेचे प्रश्न मांडू असेही त्यांनी निक्षून सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी साशंकता व्यक्त केली. तुमच्याकडे बहुमत आहे तर एवढं महत्त्वाचं पद रिकामं का ठेवत आहात? ते भरत का नाही? असा सवाल करतानाच आता जी परिस्थिती दिसते, त्यात काही बदल झाला नसेल तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.