हॉटेलात देह व्यापार, बांगला देशी तरुणी सह पाच जण ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ असलेल्या दोन हॉटेलमध्ये
छापा टाकला. हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याने ही कारवाई केली. कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एका बांगलादेशी तरुणीला देखील पोलिसांनी अटक केली असून ती बेकायदा रहात असल्याचे समोर आले आहे.
शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हॉटेल चित्रकूटमध्ये कुंटनखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच पथक रवाना केले. पंच आणि नकली ग्राहकाच्या मदतीने पथकाने पडताळणी केली. कारवाईत जवळच असलेल्या हॉटेल यशमध्ये देखील एक महिला आढळून आली.पोलीस पथकाने हॉटेल चित्रकूटमध्ये एक डमी ग्राहक पाठविला व त्यास काही आढळल्यास मिस कॉल देण्यास सांगितले. त्यानुसार डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि गणेश वाघ, उपविभागीय कार्यालयाचे पोहेकॉ विकास महाजन, सुहास पाटील, पोकॉ गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, सोनाली चव्हाण गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर या पथकाने तेथे छापा टाकला असता काउंटरवर नीलेश गुजर व चेतन माळी आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेले १५०० रुपये, मोबाईल आढळले. हॉटेलमधील एका खोलीत डमी ग्राहक व एक महिला आढळली.
हॉटेल चित्रकूटमध्ये आढलेल्या महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय सखाराम तायडे याच्यामार्फत ती येथे आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तसेच तिच्या सोबत असलेली दुसरी महिला हॉटेल यशमध्ये असल्याचे सांगितले. व्यवस्थापक विजय तायडे याच्यासह एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले. ती बांगलादेशी तरुणी बेकायदा रहात असल्याचे आढळून आले. त्या बांगलादेशी तरुणीकडे कोणतेही दस्ताऐवज आढळून आले नाही.
हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय तायडे याच्याशी बांगलादेशी तरुणीचा संपर्क झाला व देहव्यापारातून तिला पैसे दिले जाणार असल्याचे सांगून तिला येथे आणले असल्याची माहिती सदर तरुणीने पोलिसांना दिली. तिच्याजवळ एक मोबाईलही आढळून आला. याप्रकरणी पोकॉ गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडे या तिघांविरुद्ध तसेच बांगलादेशी तरुणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.