दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयासाठी ‘ब्रिज कोर्स’ राबविणार
Monday To Monday NewsNetwork।
पुणे (वृत्तसंस्था)। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या म्हणजेच विद्या प्राधिकरण च्या वतीने राज्यातील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “ब्रिज कोर्स’ राबविण्यात येणार आहे. याद्वारे मागील इयत्तातील अभ्यासक्रमाची उजळणी करून घेण्यात येणार आहे.
करोनामुळे शाळा बंद आहेत. बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून काही ना काही कालावधीसाठी वंचित राहिले होते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणातून काहीसा अभ्यास त्यांचा नक्कीच बुडालेला असणार आहे. ऑनलाइन शिक्षणालाही मर्यादा येत असल्याने विद्यार्थ्यांच्या काही संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे पुढील इयत्तेचा अभ्यासक्रम शिकविण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आधी मागील इयत्तेचा पाया भक्कम करण्याची गरज आहे. गणित, विज्ञान, समाजशास्त्र, विविध भाषा अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र “बिज कोर्स’ असणार आहे.विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर, विलास पाटील, उपसंचालक विकास गरड यांच्या मार्गदर्शनाखाली इतर विविध विभाग प्रमुख, विषय तज्ज्ञ आदींच्या सहाय्याने ब्रिज कोर्सची अंमलबजावणी सक्षमपणे करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 15 जूनपासून हा कोर्स सुरू होणार असून 45 दिवस या कोर्सचे धडे देण्यात येणार आहेत. या कोर्ससाठी विद्यार्थी, शिक्षकांना ऑनलाइन लिंक, व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीडीएफच्या स्वरुपातही विद्यार्थ्यांना स्टडी मटेरील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रिंटच्या स्वरुपातही विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना स्वअध्ययनाचे धडेही देण्यात येणार आहे.या कोर्सची माहिती आधी शिक्षकांना व्हावीसाठी वेबिनार घेण्यात येणार आहे. त्याद्वारे त्यांना कोर्सची अंमलबजावणी करण्याबाबतच्या सवीस्तर सूचना, मार्गदर्शन करण्यात येणार आहे.