भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला आहे. याप्रकरणी चौकशी करा मात्र या प्रकरणात आता चार्ज शीट किंवा अटक करता येणार नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने देत एकनाथ खडसेंना मोठा दिलासा दिला आहे.
या प्रकरणामुळे तत्कालीन मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी चौकशी पूर्ण झालेली असताना एकाच विषयाची इतक्या वेळेस चौकशी करून देखील काहीही सापडत नसल्याने भोसरी भूखंड प्रकरणी असलेला एफआयआर रद्द करावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी न्यायालयाकडे केली होती.यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय देत खडसेंना दिलासा दिला आहे.
गावंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी पुढील कारवाई न केल्याने गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने गावंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत विभागाने खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि उकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. चौकशीनंतर एप्रिल 2018च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागाने पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला, ज्यात त्यांनी खडसे यांना क्लीनचिट देण्यात आली होती.
खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचे नुकसानही झाले नाही, असे लाचलुचपत विभागाने त्या अहवालात म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.