लाचखोर जात वैधता पडताळणी सदस्य नितीन ढगेच्या घरात सापडली सव्वा कोटीची रोकड
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे, प्रतिनिधी। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त तसेच जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य नितीन ढगे यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरात केलेल्या तपासणीत तब्बल सव्वा कोटी रूपयांची रोकड सापली आहे.
जात प्रमाणपत्र वैध करण्यासाठी तब्बल आठ लाख रूपयांची लाच मागितली होती.तीन लाख रूपयांवर सौदा ठरविण्यात आला.लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने ही माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिली. त्यातील एक लाख ९० हजार रूपये घेताना पोलिसांनी ढगे यास रंगेहाथ पकडले. ढगे यास पकडल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली तसेच त्याच्या घराची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तब्बल सव्वाकोटी रूपयांची रोकड ढगे याच्या घरात सापडली आहे. या रकमेपैकी अवैध रक्कम नेमकी किती याची तपासणी करण्यात येत आहे.
ढगे याने लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी वानवडी येथील घराजवळ शनिवारी तक्रारदारला बोलविले.तक्रारदाराने ही माहिती पोलिसांना दिली त्यानुसाकर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सापळा रचून ढगे यास पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले.ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरूव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ढगे हा गेली अनेक वर्षे सामाजिक न्याय विभागात पुण्यात उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी तत्कालिन अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांनी त्याच्यावर कारवाई केली होती. मात्र, मंजुळे यांची बदली होताच त्यांनी या विभागात पूर्ववत काम सुरू केले होते.