मागितली १ लाख ८० हजारांची लाच, मात्र त्याच्या वर होती एसीबीची टाच : हवालदार रंगेहात अडकला जाळ्यात
Monday To Monday NewsNetwork।
पुणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा : पुण्यातील फुकट बिर्याणीचे प्रकरण ताजे असतानाच बारामती तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी या हवालदाराने १ लाख ८० हजारांची लाच लाच मागितली होती. लाच घेताना रंगेहात पकडलेल्या या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका मारहाण प्रकरणात तक्रारदाराचे नाव होते. हे नाव कमी करण्यासाठी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्याची हमी देत हवालदार दादासाहेब ठोंबरे यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. ठोंबरे यांनी तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंती १ लाख १० हजार देण्याचे ठरले. एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने तसेच लाच देणे चुकीचे असल्यामुळे तक्रारदाराने लाचखोर हवालदाराविरोधात तक्रार दाखल केल्याने दाखल तक्रारीनुसार ठोंबरे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
यापूर्वीही दादासाहेब ठोंबरे यांच्यावर लाच घेतल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आलंय. या अटकेमुळे ज्या पोलीस ठाण्यात नेमणूक होईल तिथे पैसे लाटण्याचं काम ठोंबरे पोलीस हवालदाराकडून होत असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.