आमच्या लोकांना नाराज करु नका, नाहीतर गडबड होईल,मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत;राऊतांचा सूचक इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,वृत्तसंस्था। शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुण्यातील भोसरी येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोठं वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेचं ऐकत नाहीत. आमचं ऐकत जा, आमच्या लोकांना नाराज करु नका, नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत, असं वक्तव्य केलं. त्यामुळे संजय राऊत यांनी मिश्किलपणे टिपण्णी केली की सूचक इशारा? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्रात सत्ता असताना देखील याभागात आपलं कोणी ऐकत नाही
संजय राऊत यांनी अजित पवारांच्या होम ग्राऊंडवर पुण्यात जाऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शिवसेनेच्या लोकांचं ऐकत नाहीत. तसंच, इथले अधिकारी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं ऐकत नाहीत, अशी तक्रार शिवसैनिकांनी राऊतांकडे केली आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. “पालकमंत्री आपले नाहीत, महाराष्ट्रात सत्ता असताना देखील याभागात आपलं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. असं कसं काय होईल? असं होता कामा नये. राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे. अजितदादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यांना आपण सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज,” असं राऊत म्हणाले.
पुढे राऊत यांनी बोलताना माझ्या बोलण्याचा चुकिचा अर्थ काढू नका, मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत कारण उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य करायचं आहे. साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात? गृहमंत्रालयाचं कार्यालय कुठे आहे? इथे हळूहळू आपल्याला पोहोचायचं आहे आणि याचा अंदाज घेण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत. तेव्हा आपण सर्वजण अजितदादांसोबत बसून बोलू की आपल्याला एकत्र काम करायचं आहे. त्यामुळे आमच्या लोकांचंही थोडं ऐकत जा अधूनमधून, आमच्या लोकांना नाराज करु नका, नाहीतर गडबड होईल जरा, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला