ईडीचे पुण्यात ७ ठिकाणी छापे,मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे, प्रतिनिधी: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पुणे वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरणाचा तपास स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. वक्फ बोर्ड नवाब मलिक यांच्या अंतर्गत येते. ईडीने आज पुण्यात ७ ठिकाणी छापे सात टाकले आहेत.
वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात आज सात ठिकाणी छापे टाकले आहेत. आज सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. मात्र पुण्यात नेमके कोणत्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वक्फ बोर्ड हे अल्पसंख्याक मंत्रालयांतर्गत येत असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे हे मंत्रालय आहे. अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करत एनसीबीच्या कामकाजावर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. तेव्हापासून मलिक चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी भाजपाच्या नेत्यावर देखील काही आरोप केले आहेत. त्यानंतर काही तासांतच वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात ऑगस्ट महिन्यात दोघांना अटक केली होती. या अधिकाऱ्यांवर पदावर असताना ७.७६ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या अखत्यारीत घेतला आहे.