सीडी नक्की येणार, वाट बघा : एकनाथ खडसेंचं पुन्हा सूचक विधान, लवकरच राजकीय भूकंप ?
पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असा सूचक इशारा एकनाथ खडसे यांनी यापूर्वी अनेकवेळा दिलेला आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्याकडे असलेल्या सीडीमध्ये नेमके काय आहे ? ते अद्याप कोणालाही माहिती नाही. मात्र आता खडसे यांनी पुन्हा एकदा याच सीडीला घेऊन सूचक इशारा दिलाय. माझी सीडी नक्की येणार आहे. आता काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा, असं सूचक विधान खडसे यांनी केलंय. खडसे यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भाजपमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्रास दिला, क्षणाक्षणाला छळलं, यामुळे पक्ष सोडावा लागला असे सांगत भाजप सोडचिठ्ठी दिल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यापासून एकनाथ खडसे आणि भाजप नेते यांच्यात नेहमीच शाब्दिक वाद होतात. पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना खडसेंनी त्यांच्याविरोधातील आरोप तसेच ईडीची चौकशी याविषयीदेखील आपली भूमिका मांडली आहे. “पुरावे न देता फक्त आरोप करायचे. तुम्हाला पुरावे देऊन चौकशी करायला कोणी अडवलं आहे का ? भाजपातल्या नेत्यांची चौकशी होत नाही, जसे की ते स्वच्छ आहेत. हे चुकीचे आहे. माझी सीडी बाहेर येणार आहे. आता सीडी बाहेर काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा.” असे खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय भूकंप होणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.