गुटका उत्पादक छाजेड बंधूंना मुंबईत अटक; १५ कोटी पेक्षा अधिक किमतीचा गुटका जप्त.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन – पुणे ।
पुणे पोलिसां कडून गुजरात राज्यातील वापी आणि दादर नगर हवेली येथील सिल्व्हासा या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला .
सिल्व्हासा येथील गुटखा उत्पादक कारखान्यात गुटख्याचे उत्पादन करणाऱ्या छाजेड बंधुंना पुणे पोलिसांनी मुंबई येथून अटक केली असून या प्रकरणात आतापर्यंत एकुण सात जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरात येणाऱ्या गुटख्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे.
अभिषके सुरेंद्र छाजेड (31) आणि शरण सुरेंद्र छाजेड (26), रा. ग्रीन एकर, लोखंडवाला कॉम्पेक्स अशी अटकेतील मुख्य गुटखा उत्पादकांची नावे आहेत. याप्रकरणी अनुष्का ट्रान्सपोर्टचा मालक प्रदीप शर्मा, सुरक्षा व्यवस्थापक संतोषकुमार चौबे, मिथून नवले (रा. गणेशनगर), विकास कदम (रा. मांजरी), सतीश वाघमारे (रा. उंड्री) यांना देखील याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सिल्व्हासा येथील गलोंडत्त गावातील कारखान्यात या गुटख्याचे उत्पादन सुरु होते. ही जागा गोवा गुटख्याचे मालक जगदीशप्रसाद जोशी यांच्या मालकीची असून ती छाजेड बंधुंनी भाड्याने घेतली होती. त्यांची काशी व्हेंचर्स या नावाची कंपनी आहे.
गेल्या दोन महिन्यात पुणे पोलिसांनी 28 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा जप्त करण्यात आला होता. या कारवाई दरम्यान आरोपींच्या चौकशीत हा गुटखा वापी व दादरा नगर हवेली येथून येत असल्याचे पोलिस पथकाला समजले होते. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी कारवाईचा बडगा उगारत तब्बल 15 कोटीपेक्षा अधिक किमतीचा माल जप्त केला होता.
गुटखा उत्पादक कारखान्यात संतोषकुमार चौबे हा सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम बघत होता. कारखान्यात तयार झालेला गुटख्यच्या वितरणाची माहिती चौबे ठेवत होता. ती माहिती चौबे बंधूना कळवली जात होती.
पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्पलेक्स भागात कारवाई करत छाजेड बंधुंना अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.