सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी मोबाईल कसा वापरावा- सरकारने दिल्या सूचना-
याची अंमलबजावणी होणार का?
Monday To Monday NewsNetwork।
पुणे(वृत्तसंस्था)। सरकारी कार्यालयात कार्यरत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनो, मोबाईल वापरताना शिष्टाचार पाळा, असा आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी (ता.२३) राज्यातील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे.
आपापल्या कार्यालयात कार्यरत असताना मोबाईल कसा वापरावा, याबाबतची मोबाईल आचारसंहिताच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो यांनी याबाबत आदेश दिला आहे.
आजच्या काळात सुलभ व वेगवान कामासाठी सरकारी कार्यालयात मोबाईल वापरणे अनिवार्य झाले आहे. परंतू याचा वापर करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिष्टाचाराचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. त्यामुळे मोबाईल वापराबाबत ची ही आचारसंहिता लागू करण्यात येत असल्याचे मालो यांनी याबाबत काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
या परिपत्रकानुसार मालो यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल वापराबाबत ११ नियम निश्र्चित केले आहेत. या नियमांचे पालन करणे हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकणार आहे.
मोबाईल वापर आचारसंहिता नियम
– कार्यालयात शक्यतो दूरध्वनीचा (लॅंडलाईन) वापर करावा
– कार्यालयात असताना फक्त कार्यालयीन कामासाठीच मोबाईल वापरावा
– मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषा वापरावी
– सौम्य आवाजात बोलावे, असंसदीय भाषेचा वापर करू नये
– बोलण्यापेक्षा लघु संदेशाचा (टेक्स्ट मेसेज) अवलंब करावा
– मोबाईल चालू असताना लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना त्वरीत प्रतिसाद द्यावा
– सामाजिक माध्यमे वापरताना वेळेचे भान ठेवावे
– अत्यावश्यक वैयक्तिक फोन कार्यालयातील कक्षाबाहेर जाऊन घ्यावेत
– वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा
– वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल पाहणे, मेसेज वाचणे, एअर फोनचा वापर टाळावा
– कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेऊ नये