देशात काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहण अशक्य,शरद पवारांचं
तिसऱ्या आघाडी बाबत स्पष्टीकरण
Monday To Monday NewsNetwork।
पुणे(वृत्तसंस्था)। राजधानी दिल्लीमध्ये पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे ही बैठक काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीबाबत चर्चेसाठी होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर आज शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. दिल्लीतील बैठकीबाबत मोठा गैरसमज पसरवण्यात आला. ही बैठक केवळ राजकीय विषयांवर नाही, तर देशातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती, असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर देशात काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहण अशक्य असल्याचंही पवार म्हणाले.
देशात काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचा पर्यायाची चाचपणी सुरु आहे का? असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावेळी बोलताना “आघाडी म्हणून आम्ही आत्ता बसलो नाही, पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. मी त्या बैठकीतही ते मांडलं. आघाडीचा चेहरा कोण असावं यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही. पण मला वाटतं सामूहिक नेतृत्व हे सूत्र पुढं ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल,” असं पवार म्हणाले.
काँग्रेसला शुभेच्छा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांनी आपला स्वबळाचा नारा सुरुच ठेवला आहे. त्यावर बोलताना प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. आमची काहीच तक्रार नाही, कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी आम्ही सर्व बोलत असतो, काँग्रेसचाही तो अधिकार आहे, असं पवार म्हणाले.