उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप लक्षात घेता अजित पवार यांचा “या” पदाचा राजीनामा
पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप लक्षात घेता अजित पवारांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्यामुळे बँकेच्या कामकाजासाठी वेळ मिळत नसल्याने राजीनामा देत असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आता पार्थ पवार अजित पवारांच्या जागेवर संचालक होणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणुकीचा कार्यक्रम लागेल, मात्र त्याआधीच पार्थ पवारांची अजित पवारांच्या जागी वर्णी लागण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेवर एकहाती सत्ता गाजवली होती. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात १९९१ साली याच बँकेतून केली होती. तब्बल ७ वेळा अजित पवार पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते.
अजितदादांकडे पालकमंत्रीपद
अजित पवारांकडे काहीच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. जुलै महिन्यामध्ये अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झाले, यानंतर त्यांना अर्थमंत्रीपद देण्यात आलं, पण तीन महिन्यानंतरही पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नव्हता. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते, अखेर सरकारने ११ पालकमंत्र्यांची अदलाबदली केली, यात अजित पवारांना पुन्हा एकदा पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं, तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचं पालकमंत्री करण्यात आलं.