संतापजनक! नात्याला काळिमा ११ वर्षीय मुलीवर वडील,भाऊ, आजोबा व मामाकडून अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्या वडिलांनं, अल्पवयीन भावाने, आजोबा आणि चुलत मामाने अमानुषतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपींनी वेळोवेळी धमकी देत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. कोरेगाव पार्क येथील एका इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीनं समुपदेशन करणाऱ्या महिलेला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली आहे.
याप्रकरणी २९ वर्षीय समुपदेशक महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बंडगार्डन पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत पिडित मुलीचे वडील (वय ४५), भाऊ (वय १४), आजोबा आणि चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच पोलीसही हादरले आहेत. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसून घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षीय पीडित मुलगी पुण्यातील कोरोगाव पार्क परिसरातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते. तर फिर्यादी महिला समुपदेशक म्हणून काम करते. घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला अल्पवयीन मुलींना ‘गूड टच आणि बॅड टच’ बाबत समजावून सांगण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, समुपदेशन करत असताना शाळेतील एका 11 वर्षीय मुलीनं आपल्यावर मागील चार वर्षांपासून अत्याचार होत असल्याची माहिती फिर्यादी महिलेला दिली.
फिर्यादी महिलेनं पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर समुपदेशन करणाऱ्या महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडित मुलीच्या मते, २०१७ साली ती बिहारमध्ये असताना तिच्या वडीलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नोव्हेबर २०२० मध्ये ताडीवाला रोड येथे वास्तव्याला असताना पीडितेच्या १४ वर्षीय भावानं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. आरोपीनं पीडितेला धमकी देत अनेकदा अत्याचार केले आहेत. एवढंच नव्हे तर, जानेवारी २०२१ मध्ये तिच्या आजोबांनी तर मे २०२१ मध्ये तिच्या चुलत मामाने तिच्याशी अतिप्रसंग केला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे करत आहेत.