राज्यभरात उन्हाचा चटका वाढला, अशातच राज्यात आजही “या” भागांत पावसाचा इशारा
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यभरात उन्हाटा चटका वाढला असून उकाड्यातही कमालीची वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी गाठल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.
शुक्रवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावरही या पावसाचा परिणाम होणार आहे. मात्र या सोबतच या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आजही या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावेल. असं असतानाही रात्री मात्र या भागांमध्ये नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे
आज विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामनाही करावा लागणार आहे. विदर्भात पावसासोबत हिट व्हेहचा अलर्टही देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर काही भागांत किमान तापमानात मोठी वाढ होऊ शकते. पुणेकरांना मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतोय. 29 मार्चला इथं 38 अंश डिग्री डिग्री सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. आता हे तापमान जरा कमी होऊन 37 अंश डिग्री सेल्सियस इतकं होण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 21 अंश डिग्री सेल्सियस इतकं असेल.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेला शेतमाल शेतात भिजला आहे. हिंगोलीच्या वसमत शहर आणि परिसरात रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे हा पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.