येत्या ४८ तासात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार पाऊस
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे , पुण्यासह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या पुढील ४८ तासांत म्हणजेच येत्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
मुंबई, पुण्यासह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे.
अजूनही काही जिल्ह्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. बाप्पाच्या आगमनाने तरी वरूणराजा प्रसन्न होईल आणि जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागून आहे. अशातच हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे.
तसेच २१ सप्टेंबरपासून मुंबई पुण्यासह कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल, आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नंदुरबार, नाशिक,जळगाव आणि धुळे जिल्ह्यासाठी अलर्ट दिला होता.
आता बुधवारी नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . याशिवाय धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.