HSC Exam : बारावी इंग्रजीचा पेपर फोडणाऱ्या सहा शिक्षकांना अटक
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बारावी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या सहा शिक्षकांविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या सहा शिक्षकांना अटेक देखील करण्यात आली आहे. कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावं आहेत. बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचं समोर आलं आहे.
राज्यभरात काल (21 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजीचा होता. परभणी जिल्ह्याच्या सोनपेठमध्ये चक्क परीक्षा केंद्र असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विदयार्थ्यांसाठी करत असल्याचा धक्कादायक प्रकार सोनपेठ पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी रात्री उशिरा उपकेंद्र संचालक कालिदास कुलकर्णी, इंग्रजी शिक्षक बालाजी बुलबुले, जिजामाता विद्यालयाचा शिक्षक गणेश जयतपाल, शिक्षकरमेश मारोती शिंदे, शिक्षक सिद्धार्थ सोनाळे, शिक्षक भास्कर तिरमले यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
रात्री पोलिसांकडून शिक्षण विभागाला याबाबत अहवाल देण्यात आला. त्यानंतर काल रात्री उशिरा या प्रकरणात या सहा शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ,मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 कलम 5,7,8,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या सहाही जणांना अटक करण्यात आली आहे.