राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत मान्सून सक्रिय, हवामान खात्याचा अंदाज
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या हलक्या सरींनी सुरुवात केली . महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील काही भागात पाऊस पडत आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात मान्सून राज्यात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे.
रायगड ते पश्चिम किनार्यापर्यंत मध्यम तीव्रतेचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि गोवा या परिसरात ढगाळ वातावरण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. काल कोकणात पुन्हा चांगला पाऊस झाला असून काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. हे सर्व वातावरण पाहता येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे.
यावर्षी मृग नक्षत्र कोराडाच गेला असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मृगात पावसाचा एकही थेंब पडला नसल्याने शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली. मात्र आता काही ठिकाणी तुरळक पावसाला सुरवात झाली आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पावसाने लंपडा सुरु केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये राज्यातील या ठराविक भागांत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.