मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी पासून येणार पाऊस।
पुणे ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आताच्या परिस्थितीला
अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेले ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता धोका नाही. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला होता. यामुळे मान्सून केरळमध्ये आठ दिवस उशिराने दाखल झाला आहे. मान्सून ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. यामुळे आता आठ दिवसांत मान्सूनचे कोकणात आगमन होणार आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. आज ८ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. पुढील ४८ तासांत बंगालचा उपसागर आणि केरळच्या बऱ्याचशा भागात मान्सून पोहचणार आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हवामान विभागाकडून घोषणा
IMD ने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून केरळमध्ये आज म्हणजेच ८ जून रोजी दाखल झाला आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग आणि मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप परिसर, केरळ, तामिळनाडू दक्षिण, कोमोरिन क्षेत्राचा काही भाग आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे.
मान्सून आला कसे जाहीर होते
– दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वारे कायम आहेत.
– पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्ये वाढ झाली आहे.
– अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे.
– या सर्व कारणांमुळे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने दिली.
महाराष्ट्रात कधी येणार मान्सून, यंदा यामुळे झाला उशीर
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होता. यामुळे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला तर राज्यात सुमारे १५ जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम यंदा झाला. केरळमध्ये १ जून रोजी येणारा मान्सून यामुळे ८ जून रोजी झाला. अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेले ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला धोका नाही.