अनैतिक संबंधाचा संशय : धारदार हत्याराने वार करून तरुणाचा खून !
Monday To Monday NewsNetwork।
पुणे-पिंपरी, मंडे टू मंडे वृत्तसेवा: भोसरी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ अनैतिक संबंधाच्या कारणावरून धारदार हत्याराने वार करून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. 26) सकाळी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अमन सुरेश डांगळे (वय 27, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) हे त्यांच्या दुचाकीवरून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, लांडगेआळी, भोसरी येथे गेले होते. सोमवारी मध्यरात्री सव्वा एक ते पाच वाजताच्या कालावधीत अज्ञातांनी अज्ञात कारणावरून अमन यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूला आणि हातावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले त्यात अमन यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत तरुणाची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय 25) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना अमन यांची पल्सर दुचाकी आणि चप्पल आढळून आली आहे. हा प्रकार अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.