राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, अनेक जिल्ह्यांत गारपीटाचा इशारा
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून (IMD) आज अनेक जिल्ह्यांत पाऊस आणि गारपीटाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
राज्यातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. इथे विजांच्या कडकडाटासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस झाल्यास नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.
तर दुसरीकडे जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, लातूर, परभणी, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.
आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोबतच गारपिटीची देखील शक्यता आहे. गारपिटीचा मोठा फटका हा शेतमालाला बसू शकतो.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कोरडं वातावरण राहणार आहे. आकाश निरभ्र राहणार असून, कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसापस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे. सोलापूरमध्ये उष्णतेची लाट असून, कमाल तापमान ४२ अंश सेल्सियस वर पोहोचलं आहे.