संतापजनक ; सार्वजनिक शौचालयातच बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असताना पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याची घृणास्पद घटना घडली.
पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या जनसेवा सार्वजनिक स्वच्छतागृहात हा संतापजनक प्रकार घडला आहे. यानंतर आरोपी पळून गेला. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे सर्वसामान्य नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत. अशाप्रकारची कृत्ये करणाऱ्यांना तातडीने कठोर शिक्षेची तरतूद असायला हवी, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी पुणे स्टेशनजवळील जनसेवा शौचालयमधील महिलांच्या स्वच्छतागृहात गेली. मुलगी अल्पवयीन असल्याचे पाहून आरोपीने पाठलाग केला आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपीचे वय अंदाजे 35 असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.