परतीचा पाऊस, राज्यात पुढील ४८ तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस, उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार?
पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यातील हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. आर्द्रता कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच हवामान विभागाने परतीच्या पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.हवामान खात्याने मुंबई, पुण्यासह नागपुरातून मान्सून माघारी परतल्याचं काल शुक्रवारी जाहीर केले.
मान्सून महाराष्ट्रातील ४५ टक्के भागातून निघून गेल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होईल. पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
तसेच राज्यातील इतर भागात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. दरवर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून साधारण १७ सप्टेंबर दरम्यान सुरू होत असतो. यंदा मान्सूनने आठवडाभर उशिरा परतीचा प्रवास सुरू केला आहे.
महाराष्ट्र राज्यात पावसाचा अंदाज काय?
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत दक्षिण महाराष्ट्र गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहे. दुसरीकडे पालघर, ठाणे, रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही.
मान्सून आतापर्यंत राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून परतला आहे. येत्या दोन-तीन दिवसात परतीचा हा प्रवास आणखीन वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.