टीईटी,म्हाडा व आरोग्य घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टीईटी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे गेल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा पुढील तपास ईडीकडून होणार हे स्पष्ट आहे.
ईडीने पुणे सायबर पोलिसांना पत्र पाठवले होते आणि या प्रकरणी सगळे कागदपत्र मागवली होती. पुणे सायबर पोलिसांनी तपासाची सर्व कागदपत्रे ईडीकडे पाठवली आहेत. त्यामुळे आता पुढे कार कारवाई होते, याची उत्सुकता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटकही केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे ईडीने पुणे पोलिसांकडून तपासासाठी मिळवली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे ईडीकडे सोपवली होती. राज्याच्या आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास सुरू असतानाच पुणे सायबर पोलिसांना म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले. म्हाडाच्या पेपर स्फोटाचा तपास सुरू असताना TET परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला होता. दोन दिवसांपूर्वी २०१९ मध्ये TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत ७८०० विद्यार्थी बोगस पद्धतीने पुणे सायबर पोलिसांच्या तपासात पात्र ठरल्याचे समोर आले आहे. या ७८०० बोगस शिक्षकांची नावे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने जाहीर केली होती. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवली जाईल. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.