ब्रेकिंग : पोलिस अधिकारीच निघाला अमली पदार्थाचा तस्कर, ४५ कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त
पुणे,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ एक पोलिस अधिकारीच ड्रग्स ची तस्करी करीत असल्याची एक धक्कादायक घटना पुण्यामधून समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्स विक्री प्रकरणात चक्क पिंपरी चिंचवडमधील एका फौजदाराला अटक करण्यात आली आहे.
सांगवी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका व्यक्तीकडून दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केलं होतं. या ड्रग्सची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात नमामी झा नामक हॉटेल चालकाला अटक करण्यात आली होती. मात्र पोलिस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली, आरोपी नमामी झाकडे जे ड्रग्स आढळून आले त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलिस स्टेशनचा अधिकारी विकास शेळके याचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत विकास शेळके याला अटक केली आहे. झडतीमध्ये त्याच्याकडून तब्बल ४५ कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.
उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान खाली गेली आहे. कारण १५ दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील दोन कर्मचारी खंडणी उकळल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. तर दोन अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लाच प्रकणात बदली करण्यात आली आहे
दरम्यान अटक करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलिस स्टेशनचा अधिकारी विकास शेळके याच्या मालकीच्या पिंपरी चिंचवड शहरात दोन ते तीन हॉटेल्स असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास आमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. शेळके यानं यापूर्वी ड्रग्स तस्करी केली आहे का? या प्रकरणात आणखी कोणते अधिकारी सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे,