राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार
पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील बहुतांश भागात पुढील तीन दिवस अवकाळीचा पावसाचा इशारा पुणे वेधशाळाने दिला आहे. तसेच येत्या दोन दिवसात अंदमान, निकोबार बेटावर आणि बंगाल उपसागराच्या दक्षिण भागात मान्सूनची आगेकूच होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे.
राज्याच्या सर्वच भागांत कमाल तापमानाचा पारा ४० ते ४५ अंशांच्या आसपास पोहचला. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून कडक उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. पण त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण पुणे वेधशाळेने पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा खाली घसरू शकतो, असे हमावान विभागाने सांगितले आहे.
मान्सून दोन दिवसांत अंदमान, निकोबार, बंगालचा उपसागर व्यापणार बंगालच्या उपसागरात सध्या जोरदार वारे वाहू लागले आहेत. राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे राज्याकडे वाहत असल्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस पुढील काही दिवस पडू शकतो. त्यामुळे पुणे वेधशाळेनेही इशारा दिला आहे की, राज्याच्या सर्वच भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. ईशान्य राजस्थानपासून ते मध्यप्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती आहे आणि बंगालच्या उपसागरापासून ते ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांपर्यंत जोरदार वारे वाहत असल्यामुळे मान्सूनचा प्रवास सुकर झाला असून पुढे सरकण्यासही अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मान्सून दाखल होण्यापूर्वीच मुसळधार पावसाची शक्यता
मान्सूनसाठी अनुकूल स्थिती तयार झाली असून वाऱ्यांचा वेगही योग्य दिशेने होत असल्यामुळे अंदमान, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील काही भागांत पुढील दोन दिवसांत मान्सून दाखल होणार असला तरी त्याआधीच या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर राजस्थानमध्ये आज आणि उद्या गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही दिवशी हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. ईशान्यकडील राज्यांबद्दल बोलायचे झाले तर आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरामध्ये पुढील २४ तासांत जोरदार पाऊस होईल, त्यानंतर पावसाचा वेग कमी होईल, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.