राज्यातील ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला;पावसाची स्थिती कायम.
Monday To Monday NewsNetwork।
पुणे(वृत्तसंस्था)। राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर तुरळक काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. यामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा काही अंशी घसरला आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात तापमान सरासरी अंश सेल्सिअसच्या आसपास घुटमळत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यावर तापलेल्या सुर्याच्या ज्वाळा कमी झाल्या आहेत.चार पाच दिवसांपासून मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेली चक्रीय वाऱ्याच्या स्थितीचा प्रभाव कमी होतं आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचं वातावरण काहीसं निवळतं आहे. असं असलं तरी दुपारनंतर याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह सौम्य पावसाच्या सरी कोसळत आहे
आज विदर्भातील अकोला याठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. येथील तापमान 41.6 अंश सेल्सिअस एवढं आहे. तर अकोल्यानंतर जळगाव आणि ब्रम्हपुरी याठिकाणी सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं आहे. येथील तापमान अनुक्रमे 41.0 आणि 40.8 अंश सेल्सिअस इतकं आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. दोन आठवड्यांपूर्वी विदर्भातील तापमानाने 43 अंश सेल्सिअसचा टप्प ओलांडला होता. विदर्भातील ब्रम्हपुरी याठिकाणी तापमान 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा अत्यंत त्रासदायक असेल, असे अंदाज बांधण्यात आले होते. पण राज्यातील ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला आहे.