पुण्याचं नामांतर ‘जिजापूर’ करा, आता या मागणीला जोर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे (वृत्तसंस्था): औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर ठेवावं, अशी मागणी विविध पक्षांकडून केली जात आहे. अशातच आता नवीन मागणी जोर धरू लागली आहे.
संभाजी ब्रिग्रेडने पुण्याचं नामांतर जिजापूर करा अशी मागणी केली आहे. जिजाऊंनीच उद्ध्वस्त झालेलं पुणं पुन्हा वसवलं. त्यामुळे पुणे हे शहर माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक आहे. त्यामुळे पुणे या शहराला जिजापूर नामांतर करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटन संतोष शिंदे यांनी केली आहे. औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करण्यावरून पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये जुंपली आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे. त्यात आघाडी सरकार असल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करीत शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तपत्राचं कात्रण ट्विट केलं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांचं विधान अधोरेखित करीत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, आता अब्दुल सत्तार खरं बोलत आहेत की खोटं? यामधील बातमीनुसार अब्दुल सत्तार म्हणाले की, मला उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली आहे. आणि शिवसेनेचा नेता मीच आहे.