सातबारा उतारा आता बंद होणार,भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,वृत्तसंस्था। राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले असून देखील सातबारा उतारा सुरू आहे,अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर हवेली तालुक्यामध्ये या प्रणालीचा वापर करून माहिती जमा केली जाणार आहे. विशेष म्हणजे यामुळे पुणे शहरासह राज्यातील अनेक शहरात जमिनींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टळणार आहे.या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर राज्यभरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमावबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली.
अनेक ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सातबारा उतार्यांचा वापर केला जातो.त्यामुळे अनेक फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत.त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.