उत्तर महाराष्ट्रासह कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा,हवामानात वेगाने बदल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,(वृत्तसंस्था)। राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पाऊस पडत आहे. उद्या मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला. विदर्भाच्या पश्चिम भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती असल्याने काही भागात पाऊस पडत आहे. तर दक्षिण छत्तीसगड व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. कर्नाटक किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
उत्तरेकडे मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, अजनेर पासून दक्षिण छत्तीसगड व परिसर, विशाखापट्टनम ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्य भागापर्यत आहे. तसेच दक्षिण छत्तीसगडच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रिय वाऱ्यांमध्ये रूंपातर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे.
दरम्यान, सध्या कोकण व पूर्व विदर्भात अंशत ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे खरीपातील पिकांना काहिसा दिलासा मिळत आहे. मराठवाडा व खानदेश, मध्य महाराष्ट्रात ऊन सावल्याचा खेळ असून कमाल तापमानात चढउतार होत आहे. आज सोमवारी (ता.३०) सकाळी आठ वाजेपर्यत जळगाव येथे ३३.४ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.
येथे होणार जोरदार पाऊस :
मंगळवार – पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, संपूर्ण राज्यात तुरळक सरी
बुधवार – रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, अकोला
गुरूवार – संपूर्ण राज्यात तुरळक सरीची शक्यता
शुक्रवार – संपूर्ण राज्यात तुरळक सरीची शक्यता