विश्रांती नंतर पाऊस पुन्हा सक्रिय, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात पावसाचा जोर वाढणार, मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या महिन्याच्या शेवटी पावसाने विश्रांती घेतली त्या नंतर मात्र ऑगस्ट च्या सुरुवातीला ४ ते ५ दिवस पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.राज्यातील धरणांमध्ये मुबलक पाणी जमा होऊ लागले, काही ठिकाणी तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्या नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती आता मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमधील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे त्या सह उत्तर विदर्भ, मराठवाड्यात विजाच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा असं दुहेरी मोठं संकट असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अतिवृष्टीची शक्यता आहे.
आज पासून पुढील ५ दिवस हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. राज्यातल्या इतर भागातही समाधानकारक पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. येथील वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे.
ऑगस्टच्या सुरुवती पासून पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या नंतर ५ ऑगस्ट पासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया. या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट इशारा देण्यात आला आहे. तर यलो इशारा –मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नागपूर भंडारा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.