मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राजकारणात उमटू लागले आहेत. आता विरोधकांकडून राज्यपालांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी म्हणत त्यांनी राजीनामा घ्या अशीही मागणी केली आहे. या प्रकरणी आता मराठी माणसाला डिवचू नका! अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील राज्यपालांना कडक इशारा दिला आहे.
आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना?
दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो अस इशारा राज ठाकरे यांनी राज्यपालांना दिला आहे.