सावदा नगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीच्या गटनेतेपदी रंजना भारंबे, तर उपगटनेतेपदी प्रतीक्षा भंगाळे बिनविरोध निवड
सावदा, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा अधिकृत नगरसेवक गट स्थापन करण्यात आला आहे. गटनेतेपदी भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या सौ. रंजना जितेंद्र भारंबे यांची तर उपगटनेतेपदी शिवसेनेच्या सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली युतीतील सर्व नगरसेवकांनी एकमताने या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
माननीय जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे अधिकृत नोंद करण्यात आली असून सावदा शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गट स्थापनेच्या वेळी सावदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील यांच्यासह भाजपा–शिवसेना युतीचे सर्व नगरसेवक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. यावेळी शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्रित धोरण राबवण्यावर भर देण्यात आला.
यावेळी गटनेत्या सौ. रंजना भारंबे म्हणाल्या, सावदा शहराच्या सेवेसाठी आम्ही सर्व सदैव्य कटिबद्ध असल्याचे नमूद करत माझ्यावर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या तसेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास दाखवत मला गटनेते पदाची संधी दिली त्याबदल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत सावदावासियांच्या सेवेस पुन्हा सज्ज असल्यचे सौ. भारंबे यांनी सांगितले
नवीन गटनेतृत्वाच्या माध्यमातून सावदा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देण्यात येईल आणि पारदर्शक, लोकाभिमुख प्रशासन राबवले जाईल, असेही युतीतील सदस्यांनी स्पष्ट केले.
या निवडीबद्दल सौ. रंजना भारंबे आणि सौ. प्रतीक्षा भंगाळे यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी जामनेरच्या नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदु महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी, महेश अकोले यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

