बौध्द धम्मामुळे आपली जगात नवी ओळख – विचारवंत बृहद्रथ सुर्यवंशी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या बौध्द धम्मामुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून विचार पुर्वक या देशाच्या मातीतुन जगात पसरलेला परंतु याच देशातुन हद्दपार झालेला धम्म या देशातील लोकांना देऊन त्यांची जगात एक नवीन ओळख निर्माण करून दिली असे प्रतिपादन राष्ट्रीय विचारवंत बृहद्रथ सुर्यवंशी तथा संजय सुर्यवंशी यांनी रावेर येथील सामाजिक समता मंचतर्फे आयोजित ६५व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त कार्यक्रमात केले.
येथील सौ. कमला बाई अग्रवाल शाळेच्या जिमखाना हॉलमधे आयोजित कार्यक्रमात पुढे बोलताना ज्या देशातून निर्माण झालेला बौध्द धम्म आज जगातील २७ देशांमध्ये पसरलेला असुन याच देशातून या धम्माला नेस्तनाबूत करण्यात आले होते. पहीले धम्मचक्र भगवान बुध्दांनी अडीच हजार वर्षापूर्वी गतीमान केले, दुसरे दिड हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने तर तिसरे धम्मचक्र ६५वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फिरवून आपल्याला बौध्द धम्म दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहुन महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की या देशातील महीलांवर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार असून प्रत्येक महीलेने महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचावे त्यांच्या पुस्तकांचे अध्ययन करावे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमात तहसिलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा कांता बोरा, नगरसेविका शारदा चौधरी, रंजना गजरे, विलास ताठे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विनोद चौधरी, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे चंदन बिर्हाडे, रमेश सोनवणे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक सामाजिक समता मंच चे कार्याध्यक्ष उमेश गाढे, सूत्रसंचालन नगीनदास इंगळे यांनी केले तर सामाजिक समता मंचचे अध्यक्ष राजू सवर्णे व संचालक मंडळाने परिश्रम घेतले.