राष्ट्रवादीच्या माजी आमदार भाजपकडून पुरस्कृत, तर महाविकास पॅनलचा उमेदवाराचाही पाठिंबा !
रावेर, प्रतिनिधी : रावेर तालुक्यातुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदारांना भाजपने पुरस्कृत केल्यानंतर अचानक राजकारणाने कलाटणी घेतली आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमधील काँग्रेसच्या उमेदवारानेही त्यांना पाठींबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गेल्या दोन दिवसापासून नाट्यमय घडामोडी घडत असून त्यातच आता रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात अतिशय अफलातून घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यामुळे व भाजपने निवडणुकीतुन माघार घेतल्याने त्यांनी थेट भाजपचा पुरस्कृत म्हणून पाठींबा घेतला. यानंतर काल माघारी नंतर माजी आमदार अरुण पाटील, जनाबाई गोंडू महाजन, राजीव पाटील असे तिन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे माजी आ. पाटील हे महाविकासच्या उमेदवाराला आव्हान देणार असे चित्र होते मात्र अचानक महाविकाच्या कॉंग्रेसच्या उमेदवाराने जनाबाई गोंडू महाजन यांनी मंगळवारी दुपारी माजी आमदार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे तालुक्यातून आता अरूण पांडुरंग पाटील यांच्या विरूध्द राजीव पाटील अशी लढत होणार असून या दोन्ही मान्यवरांमध्ये टक्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, यासर्व घडामोडीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी चर्चेचा विषय ठरत आहे. माजी आ.पाटील त्यांना भाजपने पुरस्कृत केले असूनही तालुक्यातील राष्ट्रवादीचे किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, बाजार समितीचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सुभाष पाटील आदींची उपस्थितीने ते नक्की राष्ट्रवादीचे की भाजपचे असा प्रश्न निर्माण झाला असून एकंदरीत चित्र काही सुचवू पाहतेय का ? हे येणारा काळ सांगेल…