खिर्डी परिसरात देशी दारूची अवैध खुलेआम विक्री, कारवाई शून्य
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे ,विशेष प्रतिनिधी। तालुक्यातील खिर्डीसह परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासन कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकामध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
खिर्डी येथील बसस्थानक परिसर तसेच अनेक ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी दारूची अवैध विक्री केली जाते. कामगार व युवकांना दारूचे व्यसन जडले असून दारूला ग्राहकी चांगली असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक व्यक्तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे.तसेच मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालत असून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्या महिला, कामगार, विद्यार्थी व वाहनधारकांना याच नाहक त्रास सहन करावा लागतो.तसेच गावातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये आजूबाजूच्या गावातील लहान मुले मुली या रस्त्याने येजा करत असतात या गोष्टी मुळे त्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होवू शकतो.तसेच कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.मद्यपिंच्या घरात भांडणाचे प्रकार वाढले असून यामुळे सुध्दा शेजारी पाजारी राहणाऱ्या लोकांना खूप त्रास होत असतो.तसेच गावामध्ये कार्यरत असलेल्या तंटामुक्ती समिती,ग्राम सुरक्षा समिती, दारूबंदी समिती या सर्व समित्या केवळ नावापूरत्या कागदावरच आहेत का? गावात पोलिस पाटील हे सर्व काही असूनही
दारूची अवैध विक्री थांबविण्यासाठी पुढाकार का घेतला जात नाही? याबाबत महिला वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मिळेल त्या ठिकाणी रोजंदारी करून आलेली मजुरी कामगार दारूवर खर्च करीत आहेत.दारू विक्री करणार्यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे अवैध दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.
शिवाय अनेक ढाब्यांवर रात्री उशिरापर्यंत अवैधपणे दारूची विक्री करण्यात येते.यातून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.तसेच खिर्डी परिसरात एकवेळ चहा मिळणार नाही मात्र दारू हमखास मिळते बसस्थानक परिसरात संध्याकाळी जणू काही यात्रेचे स्वरूप येत असते.या अवैध देशी दारू विक्रीवर पोलिस कारवाई करतील का नाही ? याकडे खिर्डी येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.