रावेर लोकसभा : पराभव राष्ट्रवादी शरद पवार गटाचा की उमेदवाराचा ?
मंडे टू मंडे न्युज चंमु | लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. आता निकालाचे कवित्व सुरु होणार. महाराष्ट्रात भाजपा व महायुतीला झटका देत महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. यामागे जसे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांचे डावपेच आहेत, तशीच उद्धव ठाकरे यांची मेहनत देखील आहे. तर गेल्या काळातील राजकीय उलथापालथ याचा परिमाण दिसुल आला आहे. तर कधी नव्हे ते काँग्रेस नेत्यांनीही एकजीनसी पद्धतीने काम केले, म्हणूनच राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले असे राजकीय जाणकार सांगतात.
एकीकडे राज्यात महविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळवित असतांना, जळगाव जिल्ह्यातील निकाल मात्र महाविकास आघाडीसाठी धक्कादायक लागला आहे. ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १० पैकी ८ जागा जिंकतांना आपला स्ट्राईक रेट राज्यात सर्वात जास्त ठेवला त्यांना सातारा व रावेर या दोन ठिकाणी अपयशाला सामोरे जावे लागले. सातारा येथील पराभव हा थोडक्या मतांनी झाला आहे. पिपाणी चिन्हाला मिळालेल्या ४० हजार मतांमुळे ती जागा हातून गेली. रावेरात मात्र तसे नाही. रावेर येथे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना पावणे तीन लाखांचे लीड आहेत तर येथेही पिपाणी ने ४३ हजार मते घेतली आहे ही ४३ हजार जरी वजा केली तरी भाजप उमेदवाराला सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मताचे लीड येते. यामुळं पराभव हा केवळ राष्ट्रवादी पक्षाच्याच नव्हे तर उमेदवाराच्या व महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचे अपयश सिद्ध करणारा आहे.
यासंदर्भात राजकीय पदाधिकारी वर्तुळात कानोसा घेतला असता त्यांच्याकडून बऱ्याच मुद्याकडे लक्ष अधोरेखित करण्यात आले. रावेर लोकसभा मतदार संघात झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करताना काही फॅक्ट व कारणे कार्यकर्त्यांना अधोरिखील झाली त्यांच्या शिदोरितून रावेर मतदार संघाच्या निवडणुकीचा अभ्यास केला तर सर्वात ठळकपणे निदर्शनास येते ते सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्ह्यात मोदी फॅक्टरचा असलेला प्रभाव जाणवला तसेच खासदार रक्षा खडसे यांचा दांडगा जनसंपर्क सुनेला असलेला नाथाभाऊ यांचा पाठिंबा व भाजपसह महायुतीचे समन्वय योग्य नियोजन यांचा मोठा फायदा भाजप उमेदवाराला झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील राजकारणात नवखे होते. अतिआत्मविश्वास, केवळ एका समाजाच्या बळावर रणांगणात उतरले असल्याची झालेली त्यांची प्रतिमा. निवडणुकीला सामोरे जातांना पक्षातील, आघाडीतील नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र तसे चित्र अजिबात नव्हते अशी चर्चा पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते बोलुन दाखवत आहे.
एकीकडे सलग दहा वर्षे खासदार असलेल्या व मतदारसंघावर पकड ठेवून असलेल्या खडसे घराण्यातील प्रबळ उमेदवार रक्षा खडसे प्रतिस्पर्धी उमेदवार असतांनाही श्रीराम पाटलांचे राजकीय डावपेच हे सर्वांसाठी अकलनीय होते. शेवटपर्यंत पक्षातील नेत्यांना, पक्षाच्या संघटनेला त्यांनी विश्वासात घेतलेच नाही यांच नारजीचा फटका बसला असल्याचेही कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. केवळ आपल्या नातलगांना, कर्मचाऱ्यांना, जळगावातील क्रिकेट टीमच्या खेळाडूना सोबत घेऊन लोकसभेसारखी मोठी निवडणुक जिंकू शकत नाही हे खरे तर श्रीराम पाटील यांच्या वेळीच लक्षात आले नसल्याने पराभव पत्करावा लागला असे कार्यकर्ते बोलुन दाखवतात. क्रिकेट टिममधील खेळाडूंचे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी उद्दामपणाचे बोलणे, पक्षाबाहेरील व मतदारसंघाबाहेरील जळगाव शहरातील व्यावसायिकाच्या हातात सर्व सूत्रे देणे बाहेरील एक सामान्य व्यापारी आपल्याला जाब विचारतो हेच मुळात ठिकठिकाणी नेत्यांना रुचले नसल्यानेची चर्चा राजकीय वर्तुळात असून जाणकार कार्यकर्ते बोलून दाखवत आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुक काळात दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले. त्यांना सर्व स्थानिक नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील दिले. मात्र लोकसभा मतदारसंघातील सर्वच सहाही विधानसभा मतदार संघात तसे कोठेही दिसले नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष असलेल्या अरुण गुजराथी यांच्या चोपडा विधानसभा मतदार संघात रक्षा खडसे यांना जवळपास ६४ हजार मतांचा लीड आहे. हे अरुण गुजराथी यांची पकड डिली झाली असल्याचेच द्योतक आहे. विशेष म्हणजे सर्व सहाही विधानसभा मतदार संघातून रक्षा खडसे यांना मिळालेला सर्वात जास्त लीड हा चोपड्यातील आहे.
तर दुसरीकडे माजी आमदार व भुसावळ येथील पक्षाचे सर्वेसर्वा संतोष चौधरी हे स्वत: निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी बंडाची देखील तयारी सुरु केली होती. मात्र शरद पवारांच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी झालेल्या तडजोडीत चौधरींचे हे बंड शमले. त्यांनी एक लाखाचा लीड मिळवून देऊ अशी गर्जना जामनेरच्या मेळाव्यात जाहिरपणे केली. मात्र निकालात त्याचे प्रतिबिंब कोठेही दिसले नाही. या उलट भुसावळ मतदारसंघात श्रीराम पाटील हे ४१ हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे चित्र आहेत.
मतदारसंघातील मुक्ताईनगर तालुक्यात ४६ हजाराचा लीड भाजपा उमदेवाराला आहे. भाजप उमेदवाराची होम पीच असल्याने म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा फटका येथे बसल्याचे बोलले जात असून उमेदवार श्रीराम पाटील हे मुक्ताईनगरचे विरोधी आमदार यांच्या माणसांना गाडीत घेऊन फिरत असल्याचे चर्चा राजकीय पटलावर घडत असल्याचे तरंग पक्षीय वर्तुळात होती स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांवर जाहीर अविश्वास दाखवितांनाच श्रीराम पाटील यांचे प्रतिपक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरणे यामुळे प्रामाणिकपणे प्रचार करणारे कार्यकर्ते स्तंभीत होते. हे कार्यकर्त्यांना विचलित करण्यासारखे होते. त्यांचीही किंमत उमेदवारांना मोजावी लागली असल्याची चर्चा बोलून दाखविली जात आहे. कदाचित उमेदवार पाटील यांना समजूत होती की आमदार पाटील हे, आपल्याला मदत करतील, मात्र तसे निकालात कुठेही जाणवले नाही. शेवटी शिंदे गटाच्या समर्थक आमदार पाटील यांनी महायुती धर्म पाळला.
इतेकच काय स्वत: श्रीराम पाटील यांच्या स्वत:च्या रावेर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष चौधरी असतांना देखील ३६ हजार मतांचा लीड रक्षा खडसे यांना आहे. स्वत:च्या मतदारसंघात, स्वत:च्या शहरात देखील ते पिछाडीवर आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे आमदार आहेत. असे असतांना तिथे देखील ४६ हजार मतांनी पाटील पिछाडीवर आहेत. राहता राहीला तो जामनेर मतदार संघ. इथे तर पक्षाचे सर्व मोठे स्थानिक नेते अगोदरच पक्ष सोडून भाजपाकडे गेलेले. इथेही स्वाभाविकच श्रीराम पाटील हे ३७ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
याशिवाय अनेक मुद्द्यांचा प्रभाव जनतेवर पडला. उमेदवारांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी उघडपणे मराठा मराठा केले गेल्याने मतदार संघातील इतर जाती एकत्र आल्या, त्याचा मोठा फटका श्रीराम पाटील यांना बसला. असल्याचे बोलले जाते. रावेर मतदार संघ तसा सुसंस्कारीत मतदार संघ म्हणून ओळखला जातो. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, दिवंगत नेते मधुकरराव चौधरी, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आदी धुरंधरांनी बांधलेल्या या मतदार संघात टिका टिप्पणी करतांनादेखील मर्यादा पाळल्या जातात. मात्र पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रक्षा खडसे यांचे भडक व्यंगचित्र ज्या पद्धतीने प्रचार जाहिरातींमध्ये वापरले, त्याचाही उलटा परिणाम झाल्याचे दिसून आले. भावनेच्या भरात टिका करतांना आपण एका महिलेबद्दल बोलतोय, याचेही भान राहीले नाही. त्यांचीही किंमत उमेदवारांना मोजावी लागली असल्याची चर्चा आहे.
जमिनीवरचे वास्तव समोर येते, तेव्हा हवेत केल्या गेलेल्या गोष्टी हवेत विरतात. केवळ कार्पोरेट धाटणीच्या प्रचाराने विजय मिळू शकत नाही. असे आत्मचिंत करतांना पक्षांतील कार्यकर्त्यांना लक्षात येतं असल्याच्या भावना ते बोलून दाखवत आहे. पक्षाचे संघटन एका बाजूला ठेवून स्वत:च्या खाजगी यंत्रणेच्या भारवशावर निवडणुक जिंकता येत नसते. प्रथम दर्शनी आपणास निवडणुक निकालात नेत्यांचे अपयश समोर येते, मात्र जसजसे आपण खोलात जाऊन विचार करतो तेव्हा इथला पराभव हा पक्षापेक्षाही उमेदवाराचा आहे ही बाब ठळकपणे समोर येते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकूणच उमेदवारी संदर्भात आत्मचिंतन व आत्मपरिक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. यातून भविष्यासाठी पक्ष बोध घेईल का ? असा प्रश्न पक्षीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा