मेलेले २२ बैल फेकले नदी पात्रात ; जिल्ह्यात खळबळ,रावेर तालुक्यातील प्रकार
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील चिनावल-उटखेडा दरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुलाखाली आज दि.१६ सप्टेंबर शुक्रवारी रोजी सकाळी तब्बल २२ बैल कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.
आज सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या मजुरांना पुलाजवळ दुर्गंधी आल्याने त्यांनी येथे दुर्गंधी कशी येत आहे या बाबत बघितले असता हा प्रकार उघडकीस आला, सदरचा प्रकार चिनावल गावात वाऱ्यासारखा पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली,घटनास्थळी निंभोरा व सावदा येथील पोलिसांनी पुलापासून तब्बल एक ते दीड किमी अंतर वाहून गेलेल्या बैलाना चिनावल येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृत बैलाना जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून पुरवण्यात आले. या कामी चिनावल येथील श्रीकांत सरोदे, हितेश भंगाळे, योगेश पाटील, निलेश गारसे, विशाल बोरोले, गजू साळुंके, किरण महाजन, वैभव नेमाडे व पशु संवर्धन विभागाचे डॉ लहासे,यांनी सहकार्य केले.
अधिक चौकशी केली असता ह्या रस्त्यावरून गुरांची वाहतूक केली जात असून सदरील बैल गुरांची तस्करी करतांना गुदमरुन मेलेले असल्याने या ठिकाणी फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून ही गुरे कोणी टाकली? या बाबत चौकशी होणे गरजेचे आहे