लेखी आश्वासनानंतर तांदलवाडी येथील प्रकल्पग्रस्त कुटूंबांचे जलसमाधी आंदोलन मागे
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,भिमराव कोचुरे। तालुक्यातील तांदलवाडी येथील प्रकल्पग्रस्त कुटूंबातर्फे प्रकल्पग्रस्तांना प्लॉट मिळण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत न्याय मागण्यासाठी तेथील प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले होते.
येथील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती मार्फत औरंगाबाद खंडपिठात २००८ मध्ये प्लॉटी मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.त्या निर्णयात औरंगाबाद खंडपिठाने शासनास व संबंधीत कार्यालयाला तांदलवाडी येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून एक वर्षाच्या आत नवीन गावठाणात प्लॉटी देण्याचा आदेश दिलेला होता.त्यानंतर तीन वर्षापर्यंत शासनाने पुनर्वसनाची कोणतीही कार्यवाही केलेली नाही.त्यामुळे पुन्हा २०११ मध्ये या समितीला औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करावी लागली होती.त्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून त्यांना प्लॉट वाटप करावी असा आदेश संबंधित कार्यालयाला व शासनास देण्यात आला होता.
शासनास आदेश दिला असताना तरी सुध्दा शासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी हायकोर्टाच्या व मंत्रालयाच्या आदेशाचे पालन न करता आदेशाचा अवमान केला आहे म्हणून प्रकल्पग्रस्तांनी १५ डिसेंबर २०१८ रोजी शासनास व संबंधित कार्यालयाला जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलेला होता. परंतु त्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी दोन महिन्याच्या आत पुनर्वसन करून प्लॉट देण्याचे आश्वासन दिल्यामुळे जलसमाधी आंदोलन रद्द केले होते.तेव्हापासून संबंधित अधिकारी व भूमापन भूमी अधिकारी यांच्या आडमुठे धोरण व चाल ढकल मुळे प्लॉटी मिळण्यात विलंब होत असल्यामुळे येथील १०५ प्रकल्पग्रस्त घरमालक कुटूंबिय त्यांच्याकडे असलेल्या पशुधनासह मंगळवार दि १ रोजी सकाळी १० वाजेपासून हनुमान मंदिर,महर्षी वाल्मिक नगर या ठिकाणापासून सुरू करून हतनूर बॅक वॉटरच्या पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केले होते.
आंदोलन स्थळी कार्यकारी अभियंता कुलकर्णी , उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रवींद्र भारदे,यांसह आमदार एकनाथ खडसे,माजी आमदार राजाराम महाजन,अॅड रोहीणी खडसे,तहसिलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या.निंभोरा पो.स्टे.चे सहाय्यक पो.नि.गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संबंधित प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाबाबतची कार्यवाही ३१ मार्च २०२३ पावेतो पूर्ण करण्यात येईल.असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता जळगांव मध्यम प्रकल्प विभाग क्र.१ च्या कार्यकारी अभियंता व उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे जळगांव यांच्या लेखी आश्वासनानंतर संघर्ष समिती अध्यक्ष गंभीर उन्हाळे व शशांक पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करून जलसमाधी आंदोलनास तूर्त स्थगिती देण्यात आली आहे.