मांगलवाडी रस्त्याची वाईट दुरावस्था, वाहनधारकांना मनस्ताप
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तांदलवाडी फाटा ते मांगलवाडी दोन कि.मी रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून सदरचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे गड्डे पडले असल्याने खराब रस्त्यामुळे वाहनधारकांमध्ये चकमकी होत असून अपघातांचे प्रमाणही वाढल्याने छोटया मोठया अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
हा परिसर केळीसाठी प्रसिद्ध आहे.केळी भरण्यासाठी मोठया प्रमाणात वाहने येत असतात.रस्त्यावर छोटया तसेच मोठया ट्रॅक्टर, ट्रक अशा अवजड वाहनांची ये जा सुरू असते. गड्डे चुकवितांना अपघात होत असतात.रस्ता आधीच अरुंद असून रस्त्यावर काटेरी झुडपे वाढले आहेत. वाहनधारक तसेच रस्त्याने ये जा करणाऱ्या शेतकरी शेतमजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याला साईडपट्टया नसल्यासारख्या असून त्यावर गवत व झुडपे वाढले आहेत वळण रस्त्यावरही मोठी झुडपे व खड्डे असून ते चुकवितांना वाहनधारकांच्या चकमकी होतच असतात. खराब रस्त्यामुळे एसटी महामंडळाची बसही बंद आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.