चिंचफाटा ते अजंदा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झुडपांमुळे अपघाताचा धोका
खिर्डी ता.रावेर मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। चिंचफाटा ते अजंदा रस्त्याच्या दुतर्फा गवत व मोठी काटेरी झुडपे वाढली आहेत त्यातच मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून ती काढण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
सदरचा रस्ता हा धामोडी-रावेर रस्ता असून रावेर शहराला जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे.त्यामुळे मोठया प्रमाणात लहान मोठी अवजड वाहने या रस्त्यावरून जातात.येथील वळण रस्त्यावरच अनेक मोठी झुडपे वाढलेली आहेत यामुळे समोरील येणारे वाहन अचानक आल्याने दिसत नाही.वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे साईड देण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात.त्यातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील संपूर्ण साईडपट्टयाच या गवत व झुडपांनी व्यापलेल्या आहेत.
आजूबाजूच्या गावातील केळी व्यापारी,शेतमजूर यासह प्रवासी वाहने, वाहनधारक या रस्त्याने रावेर धामोडी, निंभोरा, खिर्डी,तांदलवाडी यासह अनेक गावांना जा- ये करत असतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ सुरूच असते.परिणामी वाढलेल्या मोठया काटेरी झुडपांमुळे व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांना अडचणी येत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. लोकप्रतिनिधींचा वावर या रस्त्याने असतांनाही याकडे कोणाचे लक्षच नसल्याने वाहनधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.