प्रेमविवाहित पत्नीचे अपहरण केल्याची पतीची तक्रार
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। प्रेमविवाह केलेल्या तरुणाला व कुटुंबियांना मारहाण करून तिची इच्छा नसताना पत्नीच्या नातेवाईकांनी पत्नीचे अपहरण केल्याची तक्रार प्रेमविवाहित तरुणांकडून दाखल करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेल्या सावखेडा (ता. रावेर) येथील प्रफुल्ल रमेश पाटील वय २६ वर्ष या तरुणाने जळगाव येथील तरुणीसोबत बऱ्हाणपूर येथे न्यायालयात नोटरी पद्धतीने नोंदणीकृत प्रेमविवाह केला. नंतर दोघे आपल्या सावखेडा गावी घरी आले होते. मात्र, याचा राग तरुणीच्या नातेवाईकांना होता. त्यांनी १९ मे रोजी सावखेडा गाठून संबंधित प्रफुल्ल पाटील त्याचे आई-वडील व नातेवाईकांना मारहाण केली. पत्नीचे अपहरण केले अशी फिर्याद प्रफुल्ल रमेश पाटील यांनी दिली.
या बाबत शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीची पत्नी आणि कुटुंबातील आई-वडील, भाऊ, आजी-आजोबा घरीच होते. यावेळी सुमारे ३० ते ४० जणांचा जमाव चारचाकी वाहने व दुचाकींवर आले. अचानक घरात प्रवेश करून हातातील लोखंडी रॉडने घरातील साहित्याची नासधूस, तोडफोड केली. आई-वडिलांना मारहाण करताना फिर्यादीचा भाऊ प्रज्वलने टोळक्याचा प्रतिकार केला. पण, त्यांनी प्रज्वलच्या तोंडावर व डाव्या हाताच्या पंजाला दुखापत केली. ओढाताणीत फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले. नंतर काही लोकांनी फिर्यादी व त्याच्या आजीला लोखंडी रॉडने अंगावर मारहाण केली. फिर्यादीने प्रेमविवाह केलेल्या तरुणीला बळजबरीने घरातून ओढून नेत सोबत आणलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जळगावकडे बसवून नेत अपहरण केल्याची तक्रार साव पोलिसस्टेशनला करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.