रावेर तालुक्यातील निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यानच्या परिसरात उद्या संचारबंदी
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पिकविम्या ची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी या साठी रावेर येथे बसलेले उपोषणार्थी उद्या निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान असलेल्या तापी पुलावरुन उडी मार आंदोलन करणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रावेर तालुक्यातील निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यानच्या दोघे फाट्यापासून ते तापी पुलापर्यंत २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशी ९ तास संचारबंदी आदेश फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी जारी केले आहेत.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १८ आक्टोबर पासून रावेर तहसील कार्यालयासमोर केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने पिक विम्याची रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणेसाठी सचिन रमेश पाटील , चोरवड, ता. रावेर. व योगेश ब्रिजलाल पाटील (रा. मुंजलवाडी, ता. रावेर, हे आमरण उपोषणास बसले आहे. यातील उपोषणार्थी रमेश नागराज पाटील हे रविवार, २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान असलेल्या तापी पुलावरुन उडी मार आंदोलन करणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पिंप्रीनांदु ते निंभोरा सिम दरम्यान तापी नदीवरील पुलावर प्रवेश बंदी करण्यात आला आहे. या परिसराची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत रहावे. याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जारी केलेल्या संचारबंदी आदेशातून अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था तसेच सरकारी, रुग्णसेवा, अत्यावश्यक सेवा, खाजगी बँक, पतसंस्था व अंत्यविधी यांना लागू राहणार नाहीत. असे नमूद करण्यात आले आहे