खिर्डी येथे घाणीचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष. आरोग्य समिती देईल का लक्ष?
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी।। खिर्डी ते बलवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले आहे.यामुळे परिसरातील नागरिक,येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना व प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच परिसरातील नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व कचऱ्याचे ढीग सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या टाकी परिसरात असून ग्राम पंचायतीचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
तसेच यामुळे गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असून ऐन पावसाळ्याच्या दिवसात अनेक साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून या विषया कडे गांभीर्याने पाहिले जात नाही.अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.तसेच कचरा व्यवस्थापन नियोजन करण्यात आरोग्य समितीचे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी मात्र व्यवस्थापन करण्यात अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. सदर ठिकाणी ओला व सुका कचरा रस्त्याच्या बाजूला टाकला जात असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.