बलवाडी रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य, रस्ता दुरुस्तीची मागणी
खिर्डी ता.रावेर,मंडे टु मंडे न्यूज भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी या गावासह परिसरातील गावांना बलवाडी रस्ता हा नागपूर हायवे ला जोडला जाणारा सर्वात जवळचा रस्ता असल्याने वाहनधारक या रस्त्याचा सर्वाधिक वापर करीत असून अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यावर सोसायट्या, शाळा, महाविद्यालये असून या रस्त्याने शालेय विद्यार्थी,शेतकरी,इतर वाहन धारक नेहमी येजा करत असतात तसेच ठिकठिकाणी असलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.ऐन पावसाळ्यात खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने जणू काही तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे विशेषतः दुचाकी धारकांना आपला जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहे. पाण्यामधून वाट काढताना अनेकवेळा अंदाज न आल्यामुळे छोटेमोठे अपघाताला सामोरे जावे लागत. असून या रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्यामुळे पावसाचे पूर्ण पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्त्याला पुराचे स्वरूप येत असते.
खरे तर मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती उद्भवलेली असताना देखील यावर कुठलीही उपयोजना झाली नही, रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे खोदकाम काम करणे गरजेचे असून रस्त्यावरील जीवघेणे खड्डे त्वरित बुजविण्याची आवश्यकता असूनही संबधित विभाग एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.तसेच रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.