कुटुंबीयांनी केलेले अतिक्रमण भोवले, शिंगाडी ग्रुप ग्रा.पंचायत सदस्या सीमा पाटील अपात्र
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील शिंगाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील भामलवाडी या गावचे रहिवाशी व ग्राम पंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या सीमा योगेश पाटील यांनी शिंगाडी ग्रुप ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर रित्या रहिवास करीत असून अनधिकृतपणे बांधकाम करून मिळकतीचा गैरवापर करीत असल्याचे तक्रारदार राजेंद्र माणिकराव पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रा पंचायत सदस्या सीमा योगेश पाटील यांनी ग्राम पंचायत मालकीच्या सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले असल्यामुळे त्यांचे विरुध्द मुंबई ग्राम पंचायत अधिनियम चे कलम १४ व १६ नुसार अपात्रतेची कारवाई करणे बाबत. २३-९-२०२० रोजी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला होता.
याबाबत मंडळ अधिकारी खिर्डी यांनी चौकशी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला होता.तसेच भामलवाडी येथील गट नंबर १८ मध्ये बेघर लोकांना शासनातर्फे प्लॉट वाटप करण्यात आल्या होत्या.त्याबाबत गावी फेरफार नोंद क्रमांक ७७ व २३३ दाखल करण्यात आलेली असून सदरील जागेचा महसूल दप्तरी ७/१२ उपलब्ध नसून केवळ गाव नमुना २ला नोंद आहे.त्या वाटप झालेल्या प्लॉट पैकी एक प्लॉट ग्राम पंचायत घर नंबर १३१ ही जागा गिरधर भिका लोणारी यांना नवीन अविभाज्य शर्तीने देण्यात आला होता. तथापी गिरधर भिका लोणारी यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ३/१०/१९९३ च्या संमती पत्रानुसार सदर मिळकत जागा श्रीमती सुनंदा प्रल्हाद पाटील यांच्या ताब्यात दिली होती.
सदरच्या संमती पत्रानुसार ग्रुप ग्रामपंचायत भामलवाडी शिंगाडी यांनी ३/१०/१९९७ रोजी ठराव करून नमुना नंबर ८ ला ग्रामपंचायत सदस्या सीमा योगेश पाटील यांच्या सासू श्रीमती. सुनंदा प्रल्हाद पाटील यांचे नाव दाखल केले आहे.त्यामुळे ग्राम पंचायत घर नंबर १३१ हा गिरधर भिका लोणारी यांना शासनाने वाटप केलेला भूखंड यावर सीमा योगेश पाटील अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अतिक्रमण नसून सदर भूखंडा बाबत शर्त भंग झालेला असून कुटुंबीयांनी ग्राम पंचायत घर नंबर १३१,१३१/१ या सरकारी जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करून रहिवास करीत असल्याचे सिद्ध झाले असून ग्राम पंचायत सदस्या सीमा योगेश पाटील यांच्या वर ग्राम पंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ (ज) अन्वये तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील नंबर ६८३२/२०१८ दिनांक १६-९-२०१८ रोजीच्या आदेशानुसार कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील भाऊ,वडील,पती,सासू,सासरे, नणंद पैकी कोणीही शासकीय अथवा खाजगी जागेवर अतिक्रमण केले असता त्या सदस्याला सदस्य पदावरून निरर्ह ठरविण्यात आले आहे.त्यामुळे ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४( ज_३ ) अन्वये शासकीय अथवा खाजगी जागेवर अतिक्रमण केलेले दिसून येत आहे.त्यामुळे जळगांव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ग्राम पंचायत सदस्या सीमा योगेश पाटील यांना दि १८-१-२०२३ रोजी अपात्र घोषित करण्यात आले.संबंधित तक्रारदार राजेंद्र माणिकराव पाटील यांच्यातर्फे ऍड.प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले.