शेतकऱ्यांनी शेतीतील संशोधक व्हावे : माजी मंत्री एकनाथराव खडसे : रावेरला कृषीसेवक पुरस्काराने राज्यातील ३१ जणांचा सन्मान
रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। शेतकऱ्यांनी शेतीतील संशोधक होऊन स्वतः परिस्थितीनुसार शेतीत बदल करावा. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन माजी कृषी व महसूल मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. ते रावेर येथे साप्ताहिक कृषीसेवक तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात मार्गदशन करताना बोलत होते.
शेती व शेतीशी निगडित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध गटातील ३१ जणांचा रावेरला ६ व्या राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व जैन इरिगेशनचे संस्थापक पदमश्री स्व भरलालजी जैन यांची प्रेरणादायी पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुणदादा पाटील कार्यक्रमाचे उदघाटन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व जेष्ठ केळी तज्ज्ञ डॉ के बी पाटील यांनी केले. पुरस्कार वितरण माजी महसूल व कृषीमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन साप्ताहिक कृषीसेवक तर्फे करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी जैन इरिगेशन, महालक्ष्मी बायोजिनीक्स व माउली फाउंडेशन यांनी सहकार्य केले. हा पुरस्कार सोहळा रावेर येथील श्रीमती शेनबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष जे के पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश धनके, माजी कृषी सहसंचालक अनिल भोकरे, ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ रंजना पाटील, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, महालक्ष्मी बायोजिनीक्सचे संचालक डॉ प्रशांत सरोदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, माजी सभापती श्रीकांत महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, दत्तछाया फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जळगाव ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ सी एस पाटील, रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचा सत्कार कृषीसेवकचे संपादक कृष्णा पाटील, सहयोगी संपादक अनंत बागुल, अकोला जिल्हा प्रतिनिधी राजू पांढरे, सहकारी शरद राजपूत, राजू खिरवडकर, गणेश पाटील, तेजस पाटील, अमोल महाजन, चेतना पाटील यांनी केला. यावेळी पुरस्कारार्थींच्या कार्याचा आढावा व परिचय असलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कृषीरत्न कृषीसेवक पुरस्कार, आदर्श शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ज्ञ, कृषिमित्र, कृषी उद्योजक व उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी पुरस्कारार्थींच्यावतीने जुन्नर जि पुणे येथील शेतकरी विकास चव्हाण यांनी तर कृषीसेवकचे पहिले वार्षिक वर्गणीदार सभासद म्हणून रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे व शेतकरी प्रतिनिधी म्हणून मालेगाव जि वाशीम येथील हेमंत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्योती राणे यांनी प्रास्तविक संपादक कृष्णा पाटील यांनी केले. आभार सहयोगी संपादक अनंत बागुल यांनी मानले.
जैन इरिगेशन शेतकऱ्यांच्या पाठीशी : डॉ के बी पाटील
मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ केळी तज्ज्ञ डॉ के. बी. पाटील म्हणाले की, जैन इरिगेशनचे संस्थापक स्व. भवरलालजी जैन यांना कायम शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास होता. शेतकऱ्यांचा सन्मान केला जात नाही तोपर्यंत शेती आणि मातीचा सन्मान होत नाही हि स्व. जैन यांची भावना होती. त्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. शेतीतले शास्त्र , तंत्रज्ञान समजून घेतले पाहिजे. तरुण पिढीने शेतीतील बदल स्वीकारण्याची गरज आहे. केळीची पंढरी असलेल्या रावेर तालुक्याने सर्वात प्रथम केळीचे तंत्रज्ञान स्वीकारले. जैन इरिगेशन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास डॉ पाटील यांनी यावेळी दिला.
कृषीसेवकने मार्गदर्शक व्हावे : माजी आमदार अरुण पाटील
शेतकऱ्यांनी निसर्गाचा व बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेती करण्याची वेळ आली आहे. ज्या उत्पादनाला मागणी आहे त्याच पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे. तंत्रज्ञान स्वीकारून शेती केली तरच शेती नफ्याची होईल व शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल. शेतीबाबत सर्व माहिती देणाऱ्या कृषीसेवकने शेतकऱ्यांचे मार्गदर्शक व्हावे अशी भावना माजी आमदार अरुण पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना व्यक्त केली.