चेक अनादर प्रकरणी केळी व्यापाऱ्यांना जबर दंड व सहा महिने शिक्षा,रावेर न्यायालयाचा निकाल
मुंजलवाडी, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी-चंद्रकांत वैदकर। रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बु।।येथील न्यू नाथशक्ती केला एजन्सीचे मालक अनिल मुरलीधर चौधरी (टेलर) व मोहन रामदास महाजन याना रावेर न्यायालयाने फो.ख.नं.३००/२०१९ ३०५/२०१५ या दोन फौजदारी खटल्यांमध्ये वेगवेगळी सहा-सहा महिन्याची कारावसाची शिक्षा व दोघं प्रकरणात अनुक्रमे ४,४१,०००/- (चार लाख एक्केचाळीस हजार रुपये) व २,९४,०००/- (दोन लाख 94 हजार रुपये) दंड केलेला आहे.
सविस्तर असे की, रावेर येथील पंकज राजीव पाटील व प्रविण राजीव पाटील यांनी नाथशक्ती केला एजन्सी यांना केळीचा माल विकलेला होता. त्यामालाचे रक्कमेसाठी पंकज पाटील व प्रविण पाटील यांना दोन वेगवेगळे चेक अनिल चौधरी व मोहन महाजन यांनी दिलेले होते. बँकेच्या खात्यात चेक ची रक्कम नसतांना व त्याची माहिती असतांना ही दोघांनी केळी मालाची रक्कम दयावी लागू नये म्हणून चेक दिले होते. पंकज पाटील व प्रविण पाटील यांनी त्यासंबंधाने रावेर न्यायालयाच्या विधी सल्लागारां मार्फत कायदेशीर पुर्तता करून फौजदारी केसेस दाखल केलेल्या होत्या त्यांचा निकाल में रावेर न्यायालयाने तारीख ०४/०३/२०२३ रोजी जाहीर करून अनिल चौधरी व मोहन महाजन यांना दोषी धरून वरील प्रमाणे शिक्षा केली आहे.
सदर न्याय निर्णयामुळे शेतकऱ्यांची पिळवणुक करणाऱ्या केळी व्यापाऱ्यांना अद्दल मिळाली असुन अशा व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांकडून लाखो रुपये किमतीचा केळी चा माल घेऊन व्यापारी मुद्दामहून अशा प्रकारे न वटणारे चेक देऊन शेतकऱ्यांची फसगत करीत असतात. त्यामुळे शेतकरी हे हैराण झालेले आहेत. अशा प्रकारची बरीच प्रकरणे असुन त्याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक झालेले आहे. शेतकऱ्यांनी एकजुट होवुन अशा व्यापाऱ्यांशी कोणताही व्यवहार करू नये व अशा व्यापाऱ्यांना रावेर / जिल्ह्यात बंदी घालण्यात येऊन शेतकऱ्यांना वाचविणे आवश्यक झालेले आहे.
अनिल चौधरी व मोहन रामदास महाजन यांनी एक महिन्याचे आत दंडाची रक्कम न दिल्यास पुन्हा सहा-सहा महिन्याचा कारावासाची शिक्षा न्यायमुर्ती प्रविण पी. यादव यांनी सुनावली. सदर दोन्ही प्रकरणात फिर्यादी पंकज व प्रविण पाटील यांचे तर्फे अॅड. रविंद्र एन. चौधरी, रावेर व त्यांचे सहकारी अॅड. निलेश महाजन, अॅड. धिरज पाटील यांनी सहकार्य केले. न्यायालयाच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.