पाणलोट श्रेत्रात पावसाची दमदार हजेरी, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले
सावदा,ता.रावेर,।मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने १३ जुलै गुरुवारी रोजी संध्याकाळी धरणाचे २४ दरवाजे प्रत्येकी दीड मीटरने उघडण्यात आले.
धरणातून ७५,५४३.०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, तो वाढण्याची शक्यता लक्षात घेता तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे हतनूर धरणाच्या जलपातळीत मोठी वाढत होत आहे. परिणामी, धरणाचे ४१ पैकी २४ दरवाजे प्रत्येकी दीड मीटरने उघडले आहेत.
त्यातून सध्या ७५,५४३.०० क्यूसेस क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाचे दरवाजे खुले असल्याने नागरिकांनी नदीपात्रालगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.