पुरी-गोलवाडे येथे अवैध गावठी दारू निर्मिती सह खुलेआम विक्री
रावेर,मंडे टू मंडे न्युज,विशेष प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी येथून जवळच असलेल्या पुरी गोलवाडे शेत शिवारात तापी व सुकी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर गावठी दारूची निर्मिती होत असून आजूबाजूच्या गावात ऑर्डर प्रमाणे मोटर सायकल द्वारे गावठी दारूच्या कॅन पोहच केल्या जातात.परंतु आर्थिक सेटलमेंट मुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहे.
तसेच गावठी दारू मुळे कौटुंबिक हिंसाचार वाढत असल्याने अनेक कुटुंब या मुळे उधवस्त होत आहे. त्यामुळे गावठी दारू निर्मिती करणाऱ्या हातभट्टया नेस्तनाबूत करण्यात यावेत अशी मागणी होत आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभागाकडून अवैध दारू निर्मिती विरोधात केसेस केल्या जात असल्यातरी गावठी दारूची निर्मिती बंद झालेली नाही.गावठी दारू निर्मिती साठी घातक रसायने,नवसागर, काळा गूळ,या सारख्या घटकांचा वापर केला जातो.तसेच हि मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असूनही दारू तयार केल्या नंतर सांडपाणी जंगलातच सोडून दिले जात आहे. ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्य जीवांसाठी धोकादायक ठरत आहे.तसेच भट्टी लावण्यासाठी जंगलातील लाकडांचा वापर होत असल्यामुळे वनसंपदा देखील नष्ट होत असून याकडे वन विभागाने सुध्दा अवैध दारू निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाई करीता पुढे येणे गरजेचे आहे.तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्वरित लक्ष देवून अवैध गावठी दारू भट्टी बंद करावी अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिक करीत आहे.